मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर, यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहे. याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान या सगळ्यात आता दोन्ही युतींमध्ये जागावाटपावरून वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गेल्या वेळी, म्हणजे २०१९ मध्ये, २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत सुमारे ६१.४ टक्के मतदान झाले. यासोबतच २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळी एकूण पात्र मतदारांची संख्या ८ कोटी ९५ लाखांहून अधिक होती. मात्र, हा आकडाही वाढला आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप आणि अविभाजित शिवसेनेने एकत्रितपणे लढवली होती.