मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
सुभाष झा न्यायालयात म्हणाले, या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास होणार आहे. राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंवैधानिक ठरविण्याचा हायकोर्टाला अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण दावा बंदविरोधातील याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत युक्तिवाद सुरू आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत भीमा कोरेगाव, मराठा आरक्षण या प्रश्नांबाबत झालेल्या आंदोलनांत प्रशासन व्यवस्था ठप्प झाली होती.
यात राज्यासह बाहेरून येर्णाया नागरिकांना बंदचा मोठा फटका बसेल. सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी अॅड सुभाष झा यांनी केली आहे. पुढे बोलताना सुभाष झा म्हणाले, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणा-या लोकांविरोधात सरकारने प्रतिबंधक पावले उचलली पाहिजेत. कोणालाही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्याचा अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे.
कोणतेही विरोध प्रदर्शन हे कायदेशीरच मानले पाहिजे. बदलापुरातील ज्या घटनेसाठी विरोध होतोय तो योग्यच आहे. दोन लहान मुलींच्या बाबतीत जे काही घडले त्यासाठी आरोपीला फाशीच झाली पाहिजे. पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे, त्यासाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरणे चुकीचे आहे. बदलापुरात त्या दिवशी १० तास लोकांनी रेल रोको केला, पोलिसांवर जमावाने दगडफेक केली.
राजकारण करणे चुकीचे
अशा मुद्यांवर राजकारण होणे हे चुकीचे आहे. उद्याच्या बंदसाठी राज्यातील विरोधी पक्षाने कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकल ट्रेन, बससेवा, रस्ते कसे बंद करायचे याचे नियोजन केले गेले आहे. विरोध करण्याचा हा मार्ग राज्याच्या हिताचा नाही. यामुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय यांना मोठा फटका बसेल. तसेच राज्याचा एका दिवसाचा कितीतरी मोठा महसुलही बुडेल.
एसआयटी स्थापनेनंतरही बंद कशाला?
याचिकाकर्त्यांच्या वतीने डॉ. गुणरत्न सदावर्ते यांचा देखील युक्तिवाद सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात बंदविरोधात आक्रमक युक्तिवाद केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारने कारवाई केली आहे. राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले. अशा प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसे करणार? असा सवाल सदावर्तेंनी केला आहे.