मुंबई : राज्यात नोंदणी झालेल्या ७ लाख ६४ हजार ७३१ शेतक-यांपैकी ३ लाख ६९ हजार ११४ शेतक-यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली असून ही खरेदी इतर राज्याच्या तुलनेने सर्वाधिक आहे. देशात मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यांना मागे टाकत देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्राने केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. गरज पडल्यास सोयाबीन खरेदीला आणखी मुदतवाढ देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अनेक जिल्ह्यांनी आपले खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-याला अडचण येऊ नये, यासाठी वेगाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया करण्याची तसेच दोन ते तीन दिवसांत शेतक-यांच्या खात्यावर रक्कम पोहोचेल, यासंदर्भात वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी चालू राहणार असल्याने सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. तथापि, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची गरज भासल्यास केंद्र सरकारकडे मुदत वाढवून मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात नाफेड व एनसीसीएफ अंतर्गत ६ राज्यस्तरीय नोडल एजन्सीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून नोंदणी सुरू केली होती. त्यानुसार दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून राज्यातील ५६२ खरेदी केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली. सुरुवातीला सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी २०२५ पर्यंत होती. मात्र, मुदतीत सोयाबीन खरेदी न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांना विनंती करून खरेदीची मुदत दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे.
६ राज्यांत १८ लाख मेट्रिक टन खरेदी
मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक खरेदी केली आहे. महाराष्ट्रासह या सहाही राज्याची एकूण खरेदी १८ लाख ६८ हजार ९१४ मेट्रिक टन इतकी झाली आहे.
राज्यात नांदेडमध्ये सर्वाधिक खरेदी
महाराष्ट्राने ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. यात नांदेड जिल्ह्यात ५७ हजार ५२८ शेतक-यांकडून सर्वाधिक १ लाख २९० मेट्रिक टन इतकी सोयाबीन खरेदी झाली. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात २९ हजार ७६४ शेतक-यांकडून ६० हजार ९८९ मेट्रिक टन खरेदी झाली. सुरुवातीच्या काळात आलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून आजही वेगाने खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे रावल म्हणाले.