नाशिक : लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. मी मराठा ही जात मानत नाही. मराठा हा जर जातीवाचक वाटत असेल, तर तुम्हाला राष्ट्रगीतातून हा शब्द काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून जो शब्द दिला, तो कायम राहणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं. मराठा हे मुलखाचे नाव आहे, हे शासनाने समजून घ्यावे. जास्तीत जास्त हा आठ जिल्ह्यातील प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्रातील हा प्रश्न नाही, असं म्हणत बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.
आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. मागील अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनाला बच्चू कडू यांनी समर्थन दिलं आहे. तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मी जो शब्द दिला तो कायम असणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली.
उपोषणावर लाठीचार्ज झालेला तुम्ही कधी बघितला का ? जर तिथे लाठीचार्ज झाला नसता, तर तुम्ही जरांगे यांचे नाव घेऊन आले असते का ? फडणवीसांनी त्यांची भूमिका बदलायला नको होती. उपोषण दोन दिवस अधिक चालले असते, तर वाईट काही झाले नसते. लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.