20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयदेशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात

बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांच्या बाबतीत राज्य चौथ्या स्थानावर

नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०२२ मध्ये विविध गुन्हेगारी घटनांबाबत नवीन आकडेवारी जारी केली आहे. या अहवालात महाराष्ट्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्याचा सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. कारण देशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. एनसीआरबीने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ८२१८ दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या बाबतीत राज्य तिसऱ्या, तर बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांच्या बाबतीत राज्य चौथ्या स्थानावर आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळेच दंगलीच्या अहवालात महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये आघाडीवर राहिला. एनसीआरबीच्या अहवालात असे म्हटले आहे की, हे प्रकरणे आयपीसीच्या कलम १४७ ते १५१ (दंगल आणि बेकायदेशीर संमेलनाशी संबंधित) अंतर्गत नोंदविली गेली आहेत. महाराष्ट्रात एकूण ८,२१८ दंगलीचे गुन्हे दाखल झाले होते, ज्यामध्ये ९,५५८ लोक पीडित किंवा बळी ठरले, अशी आकडेवारी सांगते.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीने सोमवारी ‘क्राइम इन इंडिया २०२२’ अहवाल जारी केला. यानुसार, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांखाली गुन्हेगारी खटल्यांची नोंद करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी २०२२ मध्ये ४,०१,७८७ गुन्ह्यांची नोंद केली जी या वर्षातील देशातील सर्वाधिक आहे.

आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर २०२२ मध्ये हत्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र (२,२९५) तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुन्हेगारी घटनांवरील एनसीआरबी २०२२ च्या अहवालानुसार, २०२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३,७४,०३८ गुन्हेगारी (आयपीसी कलमांतर्गत) गुन्हे नोंदविली गेली. २०२१ मध्ये हा आकडा ३,६७,२१८ होता तर २०२० मध्ये ३,९४,०१७ गुन्ह्यांची नोंद झाली होती.

महाराष्ट्रात बलात्काराच्या २,९०४ घटनांची नोंद
बलात्कारासारख्या जघन्य घटनांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या पुढे आहेत. या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार २०२२ मध्ये महाराष्ट्रात बलात्काराच्या २,९०४ घटनांची नोंद झाली तर राजस्थानमध्ये ५,३९९ घटनांची नोंद झाली. या यादीत राजस्थान अव्वल आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश ३,६९० प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आणि ३,०२९ प्रकरणांसह मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.

२८ प्रकरणे धार्मिक मुद्द्यांशी संबंधित
एनसीआरबीनुसार, दंगलीची २८ प्रकरणे जातीय आणि धार्मिक मुद्द्यांशी संबंधित आहेत तर ७५ प्रकरणे राजकीय मुद्द्यांशी संबंधित आहेत. इतर २५ प्रकरणे जाती-संबंधित संघर्षांशी संबंधित आहेत. आकडेवारीनुसार, बिहार ४,७३६ दंगली प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर उत्तर प्रदेश अशा ४,४७८ प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR