मुंबई : राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात असल्यावरून महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका होत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यांत असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुर्सया तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
वर्षभराचे टार्गेट सहा महिन्यांत पूर्ण
गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त ६ महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.