22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाला नोक-या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा केला जातोय

देशाला नोक-या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा केला जातोय

उद्धव ठाकरे गटाचा भाजपसह नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : आधीच महाराष्ट्राचा उद्योग व रोजगाराच्या संधी मोदी सरकारने गुजरातमध्ये पळवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्याचा आर्थिक कणाच मोडून काढला. महाराष्ट्राच्या रोजगारावर कु-हाड चालवली. हा अन्याय आहे. हा विषय जातीय आरक्षणाच्या पलीकडे आहे. ७५ टक्के आरक्षणाचा फॉर्म्युला देऊनही आता एअर इंडियावर ‘म-हाटी’ पगडा राहणार नाही. मागासवर्गीय, अति मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, मराठा या सगळ्यांनीच विचार करावा असा हा विषय आहे. आरक्षणाचे आकडे वाढतील, अध्यादेश निघतील, पण देशाला नोक-या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा केला जातोय. हे थांबवायला हवे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने भाजपसह केंद्रातील नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. सामनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

‘‘जातीच्या आधारावर आरक्षणाची आग देशभरातच लागली आहे व गेल्या दहा वर्षांत हा भडका जरा जास्तच उडाला. याचे मूळ देशात वाढलेल्या बेरोजगारीत आहे. मोदी यांच्या काळात जवळ जवळ सर्वच सार्वजनिक उपक्रम बंद करून खासगीकरण करण्यात आले. यापैकी बहुसंख्य सार्वजनिक उपक्रमांची मालकी आता भाजपाकडे म्हणजे गौतम अदानी यांच्याकडे आहे. हे असे केल्यामुळे सरकारातील हजारो नोक-या आपण गमावल्या,’ असा आरोप ठाकरे गटानं केला आहे.

‘पंतप्रधान मोदी यांनी ८० कोटी जनतेला मोफत रेशन देण्याची योजना आणखी पाच वर्षे वाढवली. याचाच अर्थ मोदी राज्यातही गरिबी हटलेली नाही व रोजगार वाढलेला नाही. वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे वचन २०१४ पासून मोदी व त्यांचे लोक देत आहेत. पण, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे होता तो रोजगारही आपण गमावून बसलो. त्यामुळे ज्या नोक-या व रोजगार उपलब्ध नाही. त्यासाठी सर्वत्र संघर्ष सुरू आहे व तो टोकाला गेला आहे. महाराष्ट्रासारखे राज्य त्यात होरपळून निघाले आहे हे बरे नाही,’ अशा शब्दांत ठाकरे गटाने केंद्र आणि राज्य सरकारला सुनावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR