21.1 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeराष्ट्रीयमहाकुंभाला महासुरूवात!

महाकुंभाला महासुरूवात!

तगडी सुरक्षा व्यवस्था १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारीपर्यंत मेळावा

प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणा-या कुंभमेळ्याची सोमवार दि. १३ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्रान संपन्न झाले.

सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. या महाकुंभ मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणा-या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तगडी सुरक्षा व्यवस्था
उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये होणा-या या महाकुंभ मेळाव्यासाठी ४५ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठी साधू-संत, भाविक तसेच परदेशातील व्यक्ती सहभागी होणार असल्याने यंदा सुरक्षेसाठी ५५ हून अधिक फोर्स असणार आहेत. तसेच तब्बल ४५,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

२७५० पेक्षा अधिक एआय कॅमेरे
महाकुंभच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमे-यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम केले आहे. त्यासोबतच अक-आधारित तब्बल २६८ व्हीडीओ कॅमेरे गर्दीच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि पार्किंगची सोय करण्यासाठी २४० एआय-आधारित प्रणाली तैनात करण्यात आली आहे.

महाशिवरात्रीला अंतिम स्रान
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्रान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिला शाही स्रान १३ जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे. तर दुसरे शाही स्रान १४ जानेवारी रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरे स्रान २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल. तर चौथे स्रान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्रान १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचे शाही स्रान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR