पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्राच्या एकदिवसीय बैठकीत संघटनात्मक स्तरावर चर्चा करण्यात आली. निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार असल्याचे प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत संगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी भक्कम असून संभाव्य जागावाटपाबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, केंद्रात आमचे सरकार यावे यासाठीच आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला किती जागा मिळतील या प्रश्नावर ते म्हणाले, अधिकाधिक जागांवर आघाडीला विजयी करणे हे उद्दिष्ट आहे.
आघाडीत बहुजन विकास आघाडीला घेण्यास विरोध असण्याचे कारण नाही, तशी तयारी आहे. पक्षातील नेते, कार्यकर्ते अन्य पक्षात जाण्याचा प्रश्न नाही असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी संगितले. ते म्हणाले, या केवळ अफवा पसरविण्यात येत आहेत. पक्षाच्या विचारधारेवर नेते आणि कार्यकर्ते यांचा पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीपासून पक्षाने सर्वधर्मसमभावाची भूमिका स्वीकारली आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र सध्याचे केंद्रातील सरकार वेगळी भूमिका मांडत आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे सर्वांचे आहेत. राजकारण आणि धर्म याची सांगड घालणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.