सेलू : वाल्मिकी रामायणातून लक्ष्मण रेषेचा संदर्भ दिलेला नसताना देखील लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा आहे. त्यामुळे प्रत्येकाने मानवी जीवनात आपल्या मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही पाहिजे. ती सांभाळली गेली पाहिजे असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले आहे.
येथील हनुमानगढ परिसरात मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी आशीर्वचनपर बोलताना ते म्हणाले सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांनी अजिबात लक्ष्मण रेषा म्हणजेच मर्यादा ओलांडली नाही पाहिजे. महिलांनी मर्यादेत असायला पाहिजे. एवढेच नाही तर इतरांनाही मर्यादित ठेवायला पाहिजे. कोणाशी किती संबंध वाढवायला पाहिजेत याचा विवेक घरंदाज महिलांना असतो. एकमेकांशी आलेली जवळीक जीवनाचा घात करू शकते.
मर्यादा ओलांडली गेली तर चांगुलपणा वाईट ठरतो. मर्यादेच्या आत सगळे चांगले असते. तसेच एखाद्या समाजाचे एखाद्या समाजावर होणारे आक्रमण संस्कृती नष्ट करणार असेल तर समाज हा प्रतिकारक्षम असणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टींमध्ये घाईघाईने व धिंड काढून सहभागी होणे हे घातक आहे. त्यामुळे सर्वांनी सावधान राहणे आवश्यक आहे असेही स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी स्पष्ट केले.
लग्न म्हणजे संस्कार
वाल्मिकी रामायणातील श्रीराम कथेचा संदर्भ देत प्रभू श्रीरामचंद्र व सुग्रीव यांच्या मैत्रीचा संस्कार हनुमंतांनी केला आहे. संस्कार व करार यात फरक असून करार हा कधीही थांबवता येतो किंवा मोडू शकतो. मात्र संस्कारातील बंधन हे एकमेकांना कायम बांधून ठेवतात. त्यामुळे लग्न हा देखील एक संस्कार आहे तो करार नाही असे आशीर्वचनपर बोलताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी स्पष्ट केले. कोणत्याही करारामध्ये अटी असतात मात्र संस्कारमध्ये धर्माचे पालन करावे लागते.
७० टक्के माता भगिनींमुळे आपली कुटुंब स्थिर असून भारतीय संस्कृतीच्या संपूर्ण मर्यादेचे पालन माता भगिनीकडून केले जाते. जे की रामायणात लक्ष्मणाने संपूर्ण संस्कृतीच्या मर्यादेचे पालन केलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाऊन न्यायाची स्थापना करण्याचे काम भगवंताचे असते. म्हणून कोणावर अन्याय होत आहे का? याहीपेक्षा कोणाला न्याय मिळत आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
हनुमंतासह वानर सेना
हनुमानगढ परिसरात सुरू असलेल्या रामकथेत सुरुवातीपासून नियमितपणे दररोज प्रत्येक तीर्थक्षेत्राची प्रतिकृती साकारण्यात येते. त्याप्रमाणे मंगळवारी बजरंग बली हनुमान यांचे कथेतील शूर कार्य दाखवताना हनुमंत यांचेसह वानर सेना यांची सजीव प्रतिकृती साकारण्यात आली होती. श्रीराम कथेतील या वानर सेनेचे नृत्य उपस्थितांचे लक्ष वेधत होते. वानर सेनेच्या वेशभूषेतील चिमुकली विद्यार्थी उपस्थित सर्वांचे दाद मिळवून गेले.