मुंबई : प्रतिनिधी
आझाद मैदानावर गुरुवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्यासमवेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ््यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ््याला न जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मात्र हजेरी लावली होती.
अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेनंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आणि माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले. आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ््याला आझाद मैदानात दाखल झाले आहेत.