कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण स्वत: जेवण बनवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र ममता यांनी केलेल्या या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाने यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. हिंदू सणासुदीच्या काळात तेजस्वी यादव यांनी मासे खाल्ल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी ही टीका केली होती. यावर ममता यांनी सोमवारी एका जाहीर भाषणात, मी त्यांच्यासाठी (मोदींसाठी) स्वत:च्या हाताने जेवण करण्यास तयार आहे, मात्र आपण तयार केलेले जेवण मोदी खातील का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
लोकांच्या अन्नसेवनाच्या सवयींमध्येही भाजपा हस्तक्षेप करत असल्याच्या मुद्यावरून जाहीर सभेत टीका करताना ममतांनी मोदींसाठी जेवण बनवण्याची ऑफर दिली. मी त्यांच्यासाठी जेवण बनवण्यास तयार आहे. मात्र मी तयार केलेले पदार्थ खाण्यास मोदी तयार असतील का याबद्दल शंका वाटते, असेही त्यांनी नमूद केले. मी माझ्या बालपणापासून जेवण बनवते. अनेकांनी माझ्या पाककलेचे कौतुक केले आहे, असे ममता म्हणाल्या.