मुंबई : महाराष्ट्रात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १२५ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे ‘एमआयजी’ क्लब येथे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
राज ठाकरेंनी जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. राज ठाकरेंच्या मनसेच्या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या चार मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, पहिले सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान, महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या सेक्शनमध्ये दळणवळण, पाण्याचं नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट आहे.
तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे आहे. यानंतर चौथा मुद्दा हा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन इत्यादी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.