मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आपला एकच जाहीरनामा सादर करणार आहेत. पुढच्या आठवड्यात महायुतीचा जाहीरनामा समोर येण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्ष वेगवेगळा प्रचार करणार नसून, एकत्रच प्रचार देखील करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचे मोठें आव्हान असणार आहे. ज्या इच्छुकांना विधानसभेचे तिकिट मिळाले नाही ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून भाजप नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न करा, बंडखोरी होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये बंडखोरांची समजूत काढा. राज्यातील प्रमुख नेत्यांनी बंडखोरीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना महायुतीच्या बैठकीमध्ये अमित शाह यांनी नेत्यांना दिल्या आहेत.