जालना : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरु असून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनीही त्यांना वारंवार उपोषण करण्यावरुन झापले आहे.
डॉक्टरांनी जरांगेंच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर त्यात रक्तातील शुगर वाढलेले दिसून आले आहे. यावरुन डॉक्टरांनी जरांगेंना वारंवार उपोषण करत असल्याने कडक शब्दांत सूचना केल्या. शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी? असा सवालही डॉक्टरांनी त्यांना केला.
दरम्यान, मनोज जरांगे हे सध्या वर्षभरात सहाव्यांदा उपोषणला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच मराठा समाजाला सगेसोयरे या तत्वावर सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे. जर सरकार या मागण्या पूर्ण करणार नसेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून सरकारविरोधात उमेदवार उभे करण्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.