पुणे : प्रतिनिधी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्या हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या.
स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून त्यांना घेऊन पुणे ग्रामीण पोलिस पुण्याला रवाना झाले आहेत. मंत्र्याला लाच दिल्याप्रकरणी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे आता पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतक-याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा एक व्हीडीओ समोर आला होता. हा व्हीडीओ जुना होता. त्यानंतर मुळशी तालुक्यातील पौंड येथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज पहाटे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.