नवी दिल्ली : माले सरकारने चिनी हेरगिरी जहाज ‘झिआंग यांग हाँग ३’ ला मालदीवमधील बंदरात थांबण्याची परवानगी दिली आहे. चीनच्या या हेरगिरी जहाजावर भारतीय नौदलाची नजर असणार आहे. याबाबत भारताने बुधवारी आम्ही ‘झिआंग यांग हाँग ३’ या जहाजावर लक्ष ठेवू, असे सांगितले. यामुळे हे जहाज मालदीवच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधनाशी संबंधित कोणतेही कार्य करू शकणार नाही.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे जहाज मालदीवच्या पाण्यात असताना कोणतेही संशोधन कार्य करणार नाही, असे म्हटले असले तरी, वृत्तसंस्थेने भारतीय संरक्षण आस्थापनातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारत जहाजाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी जहाजाला परवानगी देण्यात आली आहे. मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू सत्तेवर आल्यानंतर आणि पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्याचा एक भाग म्हणून चीनला भेट दिली.
पारंपारिकपणे, मालदीवचे राष्ट्रपती त्यांचा पहिला परदेश दौरा म्हणून भारताला भेट असत. माले सरकारची परवानगी मिळाल्यानंतर चिनी जहाज मालदीवमधील बंदरात इंधन भरण्यासाठी थांबणार आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (२३ जानेवारी) एका निवेदनात सांगितले की, चीन सरकारने ‘पोर्ट कॉल’साठी आवश्यक मंजुरीसाठी राजनयिक विनंती केली होती. ‘पोर्ट कॉल’ म्हणजे एखादे जहाज त्याच्या प्रवासादरम्यान काही काळ बंदरावर थांबू शकते.