जालना : विशेष प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजासमोर आपली भूमिका आणि एकूणच रणनिती स्पष्टपणे मांडली. मात्र अन्य समाज घटकांशी एकोपा साधण्याच्या, तसेच उमेदवारीच्या मुद्यावर त्यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारण, विजयाचे समिकरण साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असला तरी ते अजून साधले गेलेले नाही; विजयाचे समिकरण साधल्यानंतरच उमेदवार जाहीर केले जाणार असे त्यांनीच स्पष्ट केले आहे.
मराठा-दलित-मुस्लिम मतांची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असला तरी त्याविषयीची भूमिका अद्याप धूसर आहे, कदाचित मराठा समाजातील काही घटकांकडून होत असलेला अंतर्विरोध हे त्याचे एक प्रमुख कारण असू शकते. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची संभाजीनगरात जरांगे यांनी भेट घेतली, मात्र कोणताही शब्द देण्यापूर्वी त्यांनीही पुरेसा वेळ मागितला आहे.
मराठा-मुस्लिम समरसतेचा गाडा पुढे रेटत अखेर जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. त्यांनी तूर्त आज (२० ऑक्टोबर) मराठा समाजासासमोर आपली भूमिका स्पष्ट करीत वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी इच्छूकांना अर्ज दाखल करण्याची सशर्त सूचना केली. या माध्यमातून त्यांनी समाजातील तरुणांचा उत्साह धगधगत ठेवण्याचा प्रयत्न केला हे उल्लेखनिय ठरावे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी जरांगे यांनी चार महत्त्वाचे मुद्दे सांगितले. हीच चतु:सुत्री केंद्रस्थानी ठेवून जरांगे आखाड्यात शड्डू ठोकू पहात आहेत.
चौकट
निवडणुकीसाठी चतु:सुत्री…
१) ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, त्याच ठिकाणी उमेदवार देणार.
२) राज्यात जो मतदारसंघ (एससी, एसटी) राखीव आहे, त्या जागेसाठी उमेदवार दिला जाणार नाही.
३) जिथे उमेदवार उभा केला जाणार नाही, तिथे उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून घेतले जाणार आहे.
४) जो आपल्या विरोधात भूमिका घेईल त्याला पाडायचे आहे, असेही जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटले आहे.