सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गाडी मराठा आरक्षण आंदोलकांनी माढा तालुक्यातील कुर्डुवाडीजवळ अडवली. मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी शरद पवार यांनी ‘आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे’, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर पवार हे पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
शरद पवार हे आज बार्शीच्या दौ-यावर असून शेतकरी मेळाव्यासाठी बार्शीकडे रवाना झाले आहेत. टेंभुर्णीमार्गे ते बार्शीकडे जात असताना कुर्डुवाडीजवळ आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. आंदोलकांनी पवार यांना मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. आजच्या मेळाव्यात आपण मराठा आरक्षणाबाबत आपल्या पक्षाचे म्हणणे जाहीर करावे, अशी मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.
त्यावेळी शरद पवार यांनी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. मराठा आंदोलकांना आपली भूमिका सांगितल्यानंतर शरद पवार हे पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहेत.
बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी ते आज बार्शीला आले आहेत. त्यानंतर पवारांचा सोलापूर शहरातही दौरा असून ते एका मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.