नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात हजारो शेतक-यांचा मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. शेतकरी आणि अधिकारी यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्याने शेतक-यांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दीर्घ काळापासून शेतक-यांनी नोएडा येथील सरकारी प्राधिकरणांना घेराव करत आहेत. रविवारी शेतक-यांच्या मागण्यांवर बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मागण्या मान्य न झाल्याने शेतक-यांनी चलो दिल्ली चा नारा दिला.
शेतक-यांच्या आंदोलनामुळे नोएडा आणि दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आहे. दिल्लीच्या सीमेवर सतर्कता बाळगून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक जागांवर बॅरिकेड्स लावले जात आहेत. शेतकरी नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. दिल्लीच्या दिशेने जाणा-या मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चिल्ला बॉर्डरवर वाहने खोळंबली आहेत. चिल्ला बॉर्डरवर दिल्लीच्या दिशेने येणा-या शेतक-यांना रोखणे पोलिसांसमोर आव्हान आहे. याठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
नोएडा येथील शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने येणार आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना अथॉरिटीविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. २७ नोव्हेंबरला शेतक-यांनी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाविरोधात आंदोलन केले. २८ ते १ डिसेंबरपर्यंत यमुना विकास प्राधिकरणाबाहेर निदर्शने केली. शेतक-यांच्या मागण्यांबाबत अधिका-यांशी चर्चा सुरू होती. रविवारी शेतकरी आणि प्राधिकरणाच्या अधिका-यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात शेतक-यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यानंतर शेतक-यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतला.
शेतक-यांच्या मागण्या काय?
नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ पासून अधिग्रहण जमिनीवर ४ पटीने नुकसान भरपाई दिली जावी. गौतमबुद्ध नगरमध्ये १० वर्षापासून सर्किट रेटही बदलला नाही. नव्या जमीन अधिग्रहण कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू करावा. जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात १० टक्के विकसित भूखंड दिला जावा. ६४.७ टक्के दराने नुकसान भरपाई द्यावी. शेतक-यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासात लाभ द्यावा. हाय पॉवर कमिटीच्या शिफारशी लागू करा.
दिल्लीच्या चहूबाजूने कडेकोड सुरक्षा
आंदोलनकारी शेतकरी सर्वात आधी महामाया ब्रीजजवळ दुपारी १२ पर्यंत एकत्रित जमणार आहेत. तिथून दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगड, आगरासह २० जिल्ह्यांतील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागू केला आहे. दिल्लीच्या चहूबाजूने कडेकोड सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स लावले असून तिथे तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे.