सोलापूर – शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी पीडितेचे आई-वडील, तिची सासू, पती या चौघांविरुध्द बालविवाह कायद्यासह दुष्कर्म आणि बाललैंगिक छळाच्या अधिनियमानुसार सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संजीवनी व्हट्टे यांनी
दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या नात्यातल्या मुलाशी गतवर्षी १० फेब्रुवारी २०२३ रोजी एका मंदिरात विवाह लावून दिला. लग्नानंतर ती गर्भवती राहिल्याचे दवाखान्यातील तपासणीत आढळून आले.
ती मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती सदर बझार पोलिसांना मिळताच त्यांनी शहानिशा केली असता, सदरचा प्रकार उघडकीला आला. त्यांनीवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला पीडितेची आई-वडील, तिची सासू, पीडितेचा पती जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याची दखल घेऊन चौघांविरुध्द गुन्हा नोंदवला. पीडितेच्या पतीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे हे करीत आहेत.