किनगाव : शेगी तांडा ता . मंगरूळपीर जि . वाशिम येथील रहिवाशी असलेली विवाहीत महिला आपल्या कुंटुंबियासह चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे ऊस तोडणीसाठी आले असून सततच्या ऊस तोडणीच्या कामाला कंटाळून शुकवारी अंदाजे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान शेतकरी लहू कासले रा . बेलगाव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी किनगाव पोलिसात शुक्रवारी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की वाशिम जिल्ह्यातील शेगी तांडा ता. मंगरूळपीर येथील रहिवासी मयत शिल्पा गोकुळदास चव्हाण वय २६ वर्ष ही विवाहित महिला आपले पती, सासरे व कुटुंबीयांसह दिवाळीपासून ऊस तोडणीसाठी सतत बाहेरच आहे. काही दिवसापासून ते चाकूर तालुक्यातील बेलगाव येथे ऊस तोडणीसाठी आले आहेत. विवाहिता ही सततच्या ऊस तोडणीच्या कामाला कंटाळी होती. त्यामुळे तिने कामाला कंटाळून शुक्रवारी बेलगाव येथील शेतकरी लहू कासले यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला अंदाजे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी उपचारसाठी तिला ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. डॉ. जे. एन. केंद्रे यांच्या खबरीवरून किनगाव पोलिसात आ.म्र क्र. ०४.२०२४ कलम १७४ सी.आर.पी.सी नुसार शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड हे करीत आहेत.