लासलगाव : कांदा निर्यातबंदी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटनांची येथील बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. २४) बैठक झाली.
तीत जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३० एकर जागेत राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली व लढा उभारण्याचा निर्धार करण्याची माहिती समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक निवृत्ती गारे-पाटील यांनी दिली. ॲड. उत्तम कदम अध्यक्षस्थानी होते. कांदा निर्यातबंदी निर्णयाला विरोध करत केंद्र सरकारच्या निषेध करण्यात आला. केंद्र सरकारविरोधात तीव्र लढा उभरण्यावर एकमत झाले.
राज्यातील सर्व शेतकरी संघटना वेगवेगळे आंदोलन न करता एकत्र मोठे शेतकरी आंदोलन उभारले पाहिजे, तसेच लोकसभा आणि विधानसभेवर शेतकरी प्रतिनिधी कसे जातील, याकडे लक्ष देण्याची मागणी उत्तम कदम यांनी केली.