22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeसोलापूरबार्शीजवळ फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट

बार्शीजवळ फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट

बार्शी : बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील वेलकम फायर वर्क्स या परवानाधारक फटाकेनिर्मिती कारखान्यात धग निर्माण होऊन कच्च्या केमिकलची रिअ‍ॅक्शन होऊन झालेल्या भीषण स्फोटात लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली. दरम्यान, तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी-शिराळे रस्त्यावरील बेकायदेशीर फटाका कारखान्यात दीड वर्षापूर्वी स्फोट होऊन पाच कामगार मृत झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा घारी येथे फटाकानिर्मिती कारखान्यात स्फोट होऊन मोठी आर्थिक हानी झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने स्फोट झालेला घारी शिवारातील फटाका कारखाना गत पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घारी ते शिराळे रस्त्यावर घारी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर युनूस मुसाभाई मुलाणी (वय ७०, रा. घारी) यांच्या नावावर वेलकम फायर वर्क्स या नावाने गत आठ वर्षांपासून परवानाधारक फटाकानिर्मिती कारखाना आहे. येथील कारखान्यात दैनंदिन महिला व पुरुष असे एकूण १६ कामगारांकडून शोभेच्या दारूसह, अ‍ॅटम बॉम्ब, आदल्या, शॉट आदी फटाके तयार केले जात होते. शुक्रवारी कारखाना असलेल्या शेतातील तीन खोल्यांपैकी केमिकल असलेल्या खोलीत अचानक पहिला स्फोट झाला. त्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्या स्फोटाच्या आगीच्या ज्वाळांनी लगत असलेल्या इतर तीन खोल्यांमधील स्फोटकांना आपल्या कवेत घेतले. स्फोटांच्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने स्फोटाची तीव्रता वाढली.

स्फोटांच्या आगीत फटाकानिर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, केमिकल, बांधकाम आदींसह तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्फोटाचा आवाज एवढा तीव्र होता की, घटनास्थळापासून दूर असलेल्या बंगल्याच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या. खिडकीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. आग विझवताना सतत स्फोट होत असल्याने व अग्निशमन कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. बार्शी येथून मागविण्यात आलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवताना स्फोटकावर पाणी पडताच स्फोटाचे आवाज ऐकण्यास येत होते. त्यामुळे कारखाना स्थळावर सतत स्फोटके फुटण्याचा आवाज ऐकू येत होता. पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर यांनी फटाका कारखान्यास भेट देऊन पाहणी करत खबरदारीबाबत योग्य त्या सूचनाकेल्या होत्या. घटनास्थळी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, पांगरीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक मिठु जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, नंदकुमार काशीद, मंडल अधिकारी विशाल नलवडे, महावितरणचे अभियंता प्रदिप करपे, ग्रामसेवक दर्शन मंडलिक, पोलीस पाटील संतोष फिस्के,सहाय्यक फौजदार सतीश कोठवळे, गणेश दळवी यांनी पाहणी करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. पोलिस कर्मचारी जिंदास काकडे यांनी पांगरीपोलिसांत फिर्याद दिली आहे.

पांगरी पोलीस ठाणे हद्दीत दीड वर्षापूर्वी पांगरी-शिराळे रस्त्यालगत पांगरी हद्दीत बेकायदेशीर फटाके कारखान्यात स्फोट होऊन पाच महिला कामगार ठार झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच पांगरीपासून सहा किलोमीटर अंतरावर घारी शिवारात फटाके कारखान्यात स्फोटाची पुनरावृत्ती होऊन फटाके कारखान्यात स्फोट झाला; मात्र कारखाना बंद असल्याने व सकाळची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्फोटाने आठ किलोमीटर अंतरावरील जमीन हादरली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR