बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरापासून जवळच असलेल्या खामखेड शिवारातील एका सर्जिकल कॉटन युनिटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मात्र अचानक लागलेल्या या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. कालांतराने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील खामखेड शिवारात असलेल्या या सर्जिकल कॉटन युनिटमध्ये जवळपास १५ ते २० मजूर काम करतात. या ठिकाणी वैद्यकीय वापरासाठी लागणारा कापूस तयार करून वैद्यकीय यंत्रणांना पुरविण्याचे काम केले जात होते. दरम्यान, युनिटमध्ये मजूर काम करत असताना अचानक आग लागली.