प्रयागराज : प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याची बातमी सोमर येत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २० ते २५ तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि पोलिस दलाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.
ही आग प्रयागराजमधील शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली आहे. हा सर्व परिसर महाकुंभ मेळा क्षेत्रात येतो. आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे कारण, त्या ठिकाणी तंबूमध्ये अनेक सिलिंडर ठेवण्यात आले आहेत, या सिलिंडरचा एका मागून एक असा स्फोट होत असल्यामुळे आग आधिकच भडकली आहे. अचानक आग लागल्यामुळे महाकुंभ मेळ्याव्यात चांगलाच गोंधळ उडाला असून लोक सुरक्षित जागी स्थलांतर करत आहेत.
दरम्यान या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी हवा देखील अधिक वेगाने वाहत आहे, त्यामुळे आग अधिकच भडकली आहे. त्यातच तंबूत ठेवलेल्या सिलिंडरचा एका मागून एक स्फोट होत असल्याने आग पसरण्याचा धोका आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.