23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमाऊलीच्या पूजेचा मान जालन्यातील आडे दाम्पत्याला

माऊलीच्या पूजेचा मान जालन्यातील आडे दाम्पत्याला

पुणे : ‘इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’ या ओळीप्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीने अलंकापुरी न्हाऊन निघाली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्रीपासून संजीवन समाधीवर पवमान अभिषेक ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात विधीवत करण्यात आला. यंदाच्या कार्तिकी एकदशीचा मान जालना जिल्ह्यातील परतवाडी येथील शेषराव सोपान आडे आणि गंगूबाई शेषराव आडे या कुटुंबाला मिळाला. दुस-यांदा त्यांना हा मान मिळाला आहे. २०२१ला त्यांना हा मान मिळाला होता. सात तास ते दर्शन रांगेत उभे होते. सात तास दर्शन रांगेत उभे राहून माऊलींच्या कृपेने हा मान मिळाला असल्याची भावना या शेतकरी दाम्पत्याने व्यक्त केली आहे.

आडे यांचा शेती व्यवसाय आहे. सपत्निक आषाढी वारी आणि कार्तिकी यात्रा २५ ते ३० वर्षांपासून करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आईवडिलांच्या पुण्याईमुळे आणि माऊलींची कृपा असल्याने असा योग घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे त्यांनी माऊलींकडे मागितले आहे.

मंदिर परिसरातील सनई-चौघड्यांच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, ह.भ.प. भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, अ‍ॅड. राजेश उमाप यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळ-प्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते. आज कार्तिकी एकादशीनिमित्त दुपारी १२ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची संपूर्ण आळंदी नगर प्रदक्षिणा होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आलेल्या दिंड्या सुध्दा उद्या नगर प्रदक्षिणा घालणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR