22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रजगाच्या फूल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब

जगाच्या फूल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठविले जात असतात. यामुळे लाखो रुपये शेतक-यांच्या हाती पडत असतात.

मावळ तालुका हा कोकण भागाच्या घाटमाथ्यावर. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथे शेतकरी भात पिकाचे उत्पादन घेत असे; परंतु आधुनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकरी फूलशेती करू लागला आहे. मावळ तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० एकरांवर फूलशेती पिकवली जात आहे. गुलाब, जर्बेरा अशा विविध फुलांची जागतिक बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणावर असते.

 

याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता आदी मोठ्या शहरांत फुले जातील ती वेगळीच. तसेच संपूर्ण जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आठवड्यात गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतीक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतक-यांची तीन महिना आधी लगबग सुरू असते.

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला मावळमधून ३० ते ३५ लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात होत असते. स्थानिक बाजारपेठेत ७० ते ८० लाख गुलाबांची निर्यात होत असते.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुस-या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटिंग व बेडिंगला प्रारंभ करून चांगले उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यांपासून दिवस-रात्र शेतात राबत असतात.
२० जानेवारी ते १० फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांच्या निर्यातीचा कालावधी असतो. मावळ तालुक्यात पोषक वातावरण असल्याने फुलांच्या उत्पादनाबरोबर दर्जाही उत्तम असते.

देशभरात मावळातील फुलांना चांगली मागणी असून, प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला १० ते १५ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेत १२ ते १७ रुपये भाव मिळत असतो.
‘व्हॅलेंटाईन डे’ला मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्पर क्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉइझन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉपिकल अमेजॉन, झाकिरा, पांढ-या रंगाच्या अवीलॉस या फुलांना दर्जा व टिकाऊपणामुळे जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान, दुबई व इथिओपिया या देशांतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकाता, भोपाळ, इंदूर, सुरत, हैदराबाद व गोवा या स्थानिक बाजारपेठांत सर्वाधिक मागणी असते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR