मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात येणार आहे. नरिमन पाँइंट येथील ड्रायटंड हाँटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित होईल.
महाविकास आघाडीच्या ६ तारखेला झालेल्या संयुक्त जाहीर सभेत ५ गॅरंटी जाहीर करण्यात आल्या होत्या. हाँटेल ड्रायडंटमध्ये उद्या दुपारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येईल. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहाणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात महिला, तरुण पिढी, शेतकरी, कामगार, सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह विविध घटकांना न्याय देण्याचे वचन दिले तर काँग्रसने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. यामध्ये समाजाच्या विविध घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा संयुक्त जाहिरनामा प्रसिध्द होणार आहे.
शिवसेना व काँग्रेसने जाहीर केलेल्या या योजनांचा या वचनाम्यात समावेश आहेच. त्याशिवाय अन्य योजना व मुद्यांचा संयुक्त वचननाम्यात समावेश करण्यात येणार आहे.