17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मविआचेच सरकार

राज्यात मविआचेच सरकार

मुढीकोठा : राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून २८८ जागांपैकी १७५ जागा मिळवित मविलाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवार दि. १४ नोव्हेंबर रोजी येथे व्यक्त केला.

भाजप शिंदे सरकारला शेतक-यांची चिंता नसून त्यांना फक्त खुर्चीची चिंता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय घेऊ. धानाला २३०० रुपये हमीभाव आहे, मविआचे सरकार आल्यानंतर धानाला १ हजार रुपयांचा बोगस देऊ. भाजप शिंदे सरकार शेतकरी विरोधी असल्याने भाजपाच्या हाती सत्ता देऊ नका, बळीराजाचे राज्य आणा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुढीकोठा येथे जाहीर सभा झाली. रेती माफियांचा सुळसुळाट असून त्याला भाजपचा पाठिंबा आहे. मविआ सरकार आले तर वाळू मोफत देण्याचे धोरण आणून वाळूमाफियांना आळा घालू. राज्यात भाजपाविरोधात जनतेत तीव्र संताप असून महाविकास आघाडीला १७५ जागांवर विजय मिळून सरकार स्थापन करू, असा दावा नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

योगींवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन बटेंगे तो कटेंगे चा नारा देत फिरत आहेत आणि त्यांच्या राज्यात पेपरफुटी झाल्याने लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. त्यांना स्वत:चे राज्य सांभाळता येत नाही आणि महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत.

लाखो रिक्त पदे शासकीय पद्धतीने भरणार
भारतीय जनता पक्षाचे सरकार ज्या पद्धतीने विशेष जातीच्या मुलांसाठी नोकर भरती करते तशी भरती केली जाणार नाही तर मविआचे सरकार आल्यानंतर राज्यातील लाखो रिक्त पदे शासकीय पद्धतीने भरली जातील. ज्या मुलांना नोकरी मिळणार नाही त्यांना महिन्याला ४ हजार रुपयांचा भत्ता दिला जाईल, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR