30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रजे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत त्यांना सद्बुद्धी मिळो

जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत त्यांना सद्बुद्धी मिळो

मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान झाली आहे. भारतवर्षाची प्रदीर्घ काळची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला एकटे जाण्याऐवजी पुढच्या महिन्यात संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन आपण आयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद््बुद्धी मिळो. जे रामाचे नाहीत ते कोणाच्याही कामाचे नाहीत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची मंत्रघोषात विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून याचे थेट प्रक्षेपण पाहिले. या नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आजचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आजच्या सोहळ्याचे निमंत्रण मलाही होते; पण एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ घेऊन आम्ही दर्शनाला जाणार आहोत. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामलल्लाचं एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले आहे.

प्रभू श्रीराम त्यांना सद्बुद्धी देवो

निमंत्रण असतानाही ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला, काही लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत मात्र जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, हे लोकांना माहिती आहे, अशी टीका शिंदेंनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR