22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयचव्हाणांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत बैठक

चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत असून काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे. यादरम्यान, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात राजधानीत दीर्घ काळ चर्चा झाली आणि त्यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बैठक घेत खबरदारीबाबत चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी छत्तीसगडमध्ये ‘भारत जोडो न्याय’ यात्रेत राहुल गांधी यांची भेट घेतली. यादरम्यान, चव्हाण यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ते नवी दिल्लीला गेले. पक्षातील या घडामोडींनंतर दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत बूथ कमिटी प्रशिक्षण कार्यक्रमात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. पाच फेब्रुवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. मात्र आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

प्रत्येक आमदारांशी संपर्क
येत्या बुधवारी मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचा कानोसा या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्येक आमदाराशी संपर्क साधण्यात आला. काँग्रेसचे नेमके किती आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक आमदारांची नावे चर्चेत असली तरी अद्याप कोणीच उघड भूमिका घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्व आमदारांची १४ तारखेला बैठक बोलावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR