मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. एकीकडे महायुतीची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की २० ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे. त्याच दिवशी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येतील आणि त्यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होईल.
चेन्निथला पुढे म्हणाले, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी(शरद पवार गट) प्रमुख शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते जागावाटपाबाबत चर्चा करतील. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी (शपा), काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहेत.