22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार सुधाकर भालेराव पवारांच्या भेटीला

माजी आमदार सुधाकर भालेराव पवारांच्या भेटीला

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालावर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यात उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

लोकसभेच्या निकालापूर्वीच विधानसभेची उमेदवारी निश्चित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे भाजपकडून संभाव्य उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेत माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुधाकर भालेराव हे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते. सध्या उदगीर विधानसभेत राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार आहेत. सुधाकर भालेराव आणि शरद पवार यांच्यातील चर्चेचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, महायुतीत सध्याच्या आमदारांनाच पुन्हा विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदारांनी पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर?
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. परंतु भविष्यात ते शरद पवार गटात सामिल होऊ शकतात, असे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR