मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांना गंडा घालणा-या मेहुल चोक्सीच्या परदेशातील मालमत्ता आता ईडीच्या रडारवर आल्या असून थायलंड, दुबई, जपान आणि अमेरिका येथील मालमत्तांचा ताबा मिळविण्यासाठी ईडीने आता तेथील यंत्रणांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
या चारही ठिकाणी असलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ८० कोटी रुपये आहे. प्राप्त माहितीनुसार, दुबईमध्ये त्याचा एक बंगला आणि एक ऑफिस आहे. थायलंडमध्ये देखील एक कार्यालय त्याच्या मालकीचे आहे, तर अमेरिकेतील उच्चभ्रू अशा मॅनहॅटन परिसरात त्याचा एक आलिशान फ्लॅट आहे, तर या खेरीज जीएसटीव्ही या जपानमधील कंपनीमध्ये त्याची २२.५६ टक्के हिस्सेदारी आहे. या देशातील तपास यंत्रणांना ईडीने पत्र लिहिले असून त्या मालमत्तांचा लिलाव करून ते पैसे भारतात जमा करण्याची विनंती केली आहे. अद्याप या पत्रांना संबंधित देशातून प्रतिसाद आलेला नाही. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ईडीने २५६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.