23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रवरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला शहापूरमधून केली अटक

वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला शहापूरमधून केली अटक

मुंबई : वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याने अपघातानंतर आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला. त्याने आपला मोबाईल बंद केल्याची माहिती पुढे येत होती. यानंतर आता वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. मिहिरची आई आणि बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिहीरने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह मद्यप्राशन केले. त्यांचे बिल १८ हजार ७३० रुपये झाले. ते त्याच्या मित्राने भरले. रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर तो गोरेगावला घरी गेला. त्याने आपल्या कारचालकाला लाँग ड्राइव्हला जायचे असल्याचे सांगितले. कार घेऊन तो पुन्हा मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला. गोरेगावला जाताना मिहीर स्वत: गाडी चालवत होता. त्याचवेळी त्याने वरळीत नाखवा दाम्पत्याला धडक दिली. वरळीत घडलेल्या हिट अँड रनप्रकरणी राजकीय हस्तक्षेप न करता आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. या प्रकरणातील राजेश शाह कोण आहे, याची तुम्ही माहिती घ्या, मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असले तरी मी या घटनेला राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नेमके काय घडले?
आम्ही दोघेही दुचाकीने घरी परतत असताना पाठीमागून जोरदार धडक बसली. मी खाली कोसळलो. माझी पत्नीही माझ्या पाठीवर आदळल्यामुळे तिला जास्त मार लागला नव्हता; मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवून पत्नीला फरफटत नेले, असे वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितले. मी गाडी थांबविण्याची विनंती केली, पण त्याने माझे ऐकले नाही. वेळीच ब्रेक दाबला असता तर माझी पत्नी वाचली असती असे प्रदीप नाखवा म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR