30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसंपादकीयमिमिक्री एक कला

मिमिक्री एक कला

‘हसण्यासाठी जन्म आपुला’ असे म्हटले जाते. हसण्याने आयुष्य वाढते असे म्हणतात. त्यासाठीच हास्य क्लब स्थापन झाले. माणसाचे आयुष्य सुख-दु:खाने भरलेले आहे. त्याच्या आयुष्यात चार दिवस सुखाचे तर चार दिवस दु:खाचे येतातच. जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड देत आनंदाची वाट शोधावी लागते. जगाचे ओझे आपल्याच डोक्यावर आहे अशी समजूत करून घेऊन गंभीर चेह-याने जगणा-याच्या वाट्याला दु:खच येते. हे दु:ख झुगारून देऊन समस्यांना सामोरे जाणा-याला सुखाचे चार दिवस दिसू शकतात. अर्थात त्यासाठी त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. जीवन सुस होण्यासाठीच विनोदाची कास धरावी लागते. विनोद हा निखळ, निर्झरासारखा हवा.

विरोधाभासातून विनोद निर्माण होतो. विनोद हा हळुवारपणे गुण-दोषांचे दर्शन घडवणारा, अवगुण टिपणारा असतो. विनोद हा खोचक-बोचक नसावा, एखाद्याच्या व्यंगावर बेतणारा नसावा. विनोद हा समाजकारणातील, राजकारणातील अतिशयोक्तीची खिल्ली उडवणारा असतो. कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनातही सहजपणे विनोद घडून जातो. विनोदाचे अनेक प्रकार आहेत. एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी विनोदाचा आधार घेतला जातो. माणसाच्या वर्तनातून, सवयीतून, देहबोलीतून विनोद बेतला जाऊ शकतो अथवा विनोदनिर्मिती होऊ शकते. एखाद्याची नक्कल करताना विनोदनिर्मिती होते. म्हणूनच नक्कल ही एक कला आहे असे म्हटले जाते. संपत सरल, दिवंगत राजू श्रीवास्तव आदी कलाकारांनी राजकीय व्यक्तींची खिल्ली उडवताना, नक्कल करताना विनोदाचे फव्वारे उडवले आहेत. मराठीतील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रमही त्यासाठीच प्रसिद्ध आहे. नक्कल प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घातला गेला. संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी ‘इंडिया’ महाआघाडीच्या बहुसंख्य खासदारांना सरकारने निलंबित केले.

नव्या संसद भवनातील मकरद्वाराच्या पाय-यांवर बसलेल्या विरोधी खासदारांच्या घोळक्यामध्ये उभे राहून तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. या घटनेचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चित्रीकरण केले होते. या घटनेवर धनखड यांनी राज्यसभेत सकाळच्या सत्रात निषेध व्यक्त केला होता. धनखड यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवण्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले. पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेचा निषेध केला. मिमिक्री करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेबद्दल कल्याण बॅनर्जी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, मिमिक्री ही एक कला आहे. धनखड यांनी ती स्वत:वर का घेतली माहीत नाही. पंतप्रधान मोदींनी २०१४ ते २०१९ दरम्यान अनेक सभांमध्ये अशाच प्रकारचे कृत्य केले होते. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेले खासदार संसद परिसरात विरोध प्रदर्शन करत होते. त्यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री सुरू केली होती. या प्रकरणाने बुधवारी जातीय वळण घेतले.

शेतक-यांचा आणि जाट समाजाचा अपमान झाल्याची टिप्पणी उपराष्ट्रपती धनखड यांनी केली. माझा कितीही अपमान झाला तरी मी सहन करू शकेन, पण माझ्या पदाचा, शेतकरी समुदायाचा, माझ्या समाजाचा (जाट) अपमान कधीही सहन करणार नाही, असा संताप धनखड यांनी राज्यसभेत व्यक्त केला. ज्यांनी नक्कल करणा-यांचे चित्रीकरण केले आणि नक्कल करणा-याला प्रोत्साहन दिले त्यांच्यावर हेच संस्कार झाले का असा, सवाल करत राहुल गांधींना धनखड यांनी लक्ष्य केले. यावर कोणी कुणाचा अपमान केला? खासदार पाय-यांवर बसले होते, मी चित्रीकरण केले ते माझ्या फोनमध्ये आहे. प्रसारमाध्यमे काही भलतेच दाखवत आहेत. पंतप्रधान मोदी वारंवार टिप्पणी करत असतात, पण कोणीच काही बोलत नाही, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मिमिक्री प्रकरणावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात. पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये.

दहा वर्षांत मोदींनी संसदेत अन् बाहेर विरोधकांच्या नकलाच केल्या होत्या. नकलाकारांची नक्कल झाली तर ती त्यांना का झोंबावी? न झालेल्या अपमानाचे भांडवल पंतप्रधान मोदी व त्यांचा भाजप करत आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी राज्यसभेत संसद घुसखोरीच्या मुद्यावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्री शहा यांच्या विरोधात उग्र रूप धारण केले तेव्हा उपराष्ट्रपतींनी भाजपविरोधी खासदारांना निलंबित केले. संसदेच्या पायरीवर निलंबित खासदार घोषणा देत बसले. त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांच्या वागण्या-बोलण्याची नक्कल करून हशा व टाळ्या मिळवल्या, हा आता वादाचा विषय ठरला. गत दहा वर्षांपासून मोदींनी संसदेत व बाहेर विरोधकांच्या नकलाच केल्या. त्यामुळे एखाद्याची नक्कल करणे हा दंडनीय अथवा रडारड करण्यासारखा अपराध नाही. संविधानाची खुर्ची म्हणजे पानाची गादी नाही, की राष्ट्रीय प्रश्नावर फक्त चुना लावत बसायचे! सध्या देशात तेच चालले आहे. एखाद्या व्यक्तीची नक्कल केली गेल्यास ती खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा त्या व्यक्तीने दाखवायला हवा. नक्कल केल्याप्रमाणे धनखड यांचे वर्तन नसेल तर त्यांना राग का यावा?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR