मीरा-भाईंदर : प्रतिनिधी
मीरा-भाईंदरमध्ये टोरेस कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कंपनीची ९ कोटी रुपये जमा असलेली बँक खाती गोठवली आहेत. ही कारवाई करत गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या टोरेस कंपनीला मोठा दणका देण्यात आला आहे.
मीरारोडच्या रामदेव पार्क परिसरात टोरेस कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाकडून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले जात होते. या योजनेत चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने मीरा-भाईंदरमधील शेकडो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, सोमवारी अचानक कंपनीचे कार्यालय बंद करून कर्मचारी पसार झाले. त्यानंतर फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास येताच गुंतवणूकदारांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केली होती.
या तक्रारींवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांची तपासणी केली असता, एका खात्यात १ कोटी ७७ लाख रुपये तर दुस-या खात्यात ७ कोटी ४० लाख रुपये असल्याचे आढळून आले होते. ही रक्कम कंपनीकडून इतरत्र वळवली जाऊ नये किंवा ती काढून घेतली जाऊ नये, म्हणून पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती बँकांना देत दोन्ही खाती गोठवली आहेत.
या दोन्ही खात्यांमध्ये एकूण ९ कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. मीरा-भाईंदर पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .
गुंतवणूकदारांची संख्या लाखांवर
वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारे जाहिरातबाजी आणि मार्केटिंग साखळी तयार करीत कंपनीने सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात ओढले. अनेकांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळींना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे टोरेसने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक असून फसवणुकीचा आकडा ५०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
आधी विश्वास; नंतर घात
डिसेंबर महिन्याचा परतावा कंपनीने थकवला. याबाबत गुंतवणूकदारांनी विचारले असता पुढील आठवड्यात एकत्र रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आले. जवळपास दहा महिने दर आठवड्याला बँक खात्यांवर नियमितपणे परतावा जमा होत असल्याने गुंतवणुकदारांनी यावर विश्वास ठेवला. याचदरम्यान कंपनीने रोख गुंतवणूक केल्यास ठराविक दिवसांत दुप्पट परतावा देणारी योजना सुरू केली. विश्वास बसलेल्या असंख्य व्यक्तींनी २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पुन्हा लाखो रुपयांची रोख गुंतवणूक केली.