नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीत मोठी कारवाई केली आहे. ईडीने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना अटक केली आहे. एका मनी लॉन्ड्रींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडी आज अमानतुल्लाह खान यांच्या घरी दाखल झाली होती. चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना आर्थिक हेराफेरी, अनियमित भरती करण्याचे आरोप आहेत. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशा-यावर विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप आप नेत्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे एक पथक आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरी दाखल झाले. यावेळी ईडीच्या पथकाने जवळपास ५ तास आमदार खान यांची चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. ईडीचे पथक घराबाहेर दाखल झाले होते तेव्हा, अमानतुल्लाह खान यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्यात ते म्हणतात की, चौकशीच्या नावाखाली ईडीचे लोक मला अटक करण्यासाठी माज्या निवासस्थानी आले आहेत. मला अटक करणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे. मलाच नाही तर माज्या संपूर्ण पक्षाला त्रास दिला जात आहे. त्यांचा उद्देश फक्त मला आणि माझा पक्ष फोडणे हा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की याआधी न्यायालयाकडून जसा न्याय मिळाला आहे, तसाच न्याय पुन्हा मिळेल, असे खान यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.दरम्यान, अटकेच्या कारवाईदरम्यान अमानतुल्लाह खान यांच्या घराबाहेर सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांची एक तुकडी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली होती.
तानाशाही सरकारच्या इशा-यावर ईडीची कारवाई:संजय सिंह
अमानतुल्लाह खान यांच्या अटकेबाबत आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. अमानतुल्लाह खान यांच्या सासूला कर्करोग आहे. तसेच अमानतुल्लाह खान यांनी ईडीकडे काही वेळ मागितला होता. तरी देखील ईडीने त्यांना ताब्यात घेतले. अमानतुल्लाह खान यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना त्यांना अटक केली गेली. मात्र ईडीने ही कारवाई मोदींच्या तानाशाही सरकारच्या इशा-यामुळे मुळे केली आहे, असा आरोप खासदार संजय सिंह यांनी केला आहे.