22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार गोपीचंद पडळकरांचा मोर्चा जत विधानसभेकडे

आमदार गोपीचंद पडळकरांचा मोर्चा जत विधानसभेकडे

सोलापूर : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचेही बोलले जात आहे.

मात्र, होम पिच असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाऐवजी जतमधून लढणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पडळकर आजपासून (१ जून) जत तालुक्याचा दौरा करत आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत.

जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत व बहुजन समाजाची संख्या मोठी आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपकडे सध्या सर्व समाजाला एकसंध ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची तयारी सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून होम पिच असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिंदे गटाकडे मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार? हेही स्पष्ट नाही. दिवंगत आमदार अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९च्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात पडळकरांनी मोठे योगदान दिले होते. मात्र, यानंतर २०१९ ची चूक सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीररीत्या अनेक कार्यक्रमांमध्ये बोलून दाखवले आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली असली, तरी शिंदेसेना पुन्हा मतदारसंघावर दावा करत अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर खानापूरमधून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भेटीगाठीचे कार्यक्रमही सुरू ठेवले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR