मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने दणका दिला आहे. त्यांचे मुख्य प्रवक्तेपद सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आले.
राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत. आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांना हा धक्का मानला जात आहे. मात्र, आ. मिटकरी यांनी माझ्यासाठी हा धक्का वगैरे काहीही नाही. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी अकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे म्हटले तर उमेश पाटील यांनी मुख्य प्रवक्तेपद रिक्तच होते. हे पद आधी नवाब मलिक यांच्याकडे होते. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने ही जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, असे म्हटले.