कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघाचे महायुतीसोबत असलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष की महायुतीकडून लढणार, याबाबत संभ्रमावस्था असतानाच त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष व राजर्षि शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षि शाहू विकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे आमदार यड्रावकर हे पुन्हा याच आघाडीकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसनी ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर अडचणीत आलेले यड्रावकर अपक्ष लढून विजयी झाले. लगेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीतून राज्यमंत्रिपद मिळवले. शिवसेना फुटल्यानंतर ते सत्तेसोबत गेले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सहयोगी आमदार म्हणून पाठिंबा दिला.
आगामी विधानसभेला त्यांनी पुन्हा अपक्ष लढावे, असा त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे. महायुतीचे उमेदवार झाल्यास दलित, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण कसे होईल, याचीही चाचपणी ते करत आहेत. कारखान्याच्या वार्षिक सभेत विधानसभा निवडणुकीबाबत जनता काय सांगेल तसा निर्णय घेऊ, असेही यड्रावकर यांनी जाहीर केले होते.