मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज विधानभवनात पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या इतर आमदारांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणे टाळले आहे.
विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू होताच महाविकास आघाडीतीलकाँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचे आमदार सभात्याग करत बाहेर पडले. या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि नंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ईव्हीएम गडबडीचे सरकार : जाधव
ईव्हीएममध्ये गडबड करून हे सरकार स्थापन झाले आहे. महायुतीला मिळालेले पाशवी बहुमत हे जनतेचा जनादेश नसून ईव्हीएमची कमाल आहे, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
दानवेच्या दालनात बैठक
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात सध्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक झाली आणि या बैठकीत आमदारकीची शपथ घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर आमदार उपस्थित आहेत.