सांगली : तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी आज पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. कवठे महांकाळचे माजी नगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे प्रकरण तालुक्यात तापले आहे.
माजी खासदार संजयकाका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केली. मध्ये आलेल्या त्यांच्या आईला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात माजी खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात आमदार सुमन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
नेमके काय घडले?
अय्याज मुल्ला सकाळी फिरून आले. घराबाहेर बसलेले असताना संजयकाका पाटील यांचे पीए खंडू होवळे तिथे आले. त्यांनी संजयकाका पाटील भेटायला येणार आहे, असे सांगितले. त्यानंतर दोन-तीन गाड्या मुल्ला यांच्या घराबाहेर आल्या. गाड्यांमधून संजयकाका पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. ते घरात घुसले आणि मुल्ला यांना शिवीगाळ करायला सुरूवात केली. मध्यस्थी करायला आलेल्या मुल्ला यांच्या आईला आणि इतर महिलांनाही शिवीगाळ करत कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकारावर संजयकाका पाटील म्हणाले, माझे स्वीय सहायक खंडू होवाळे यांना अय्याज मुल्ला, बाळासाहेब पाटील आणि पिंटू कोळेकर यांनी मारहाण केली. याबद्दल विचारणा करायला गेलो. त्यावेळी अरेरावीची आणि मारण्याची भाषा केली. माझ्या कार्यकर्त्याच्या कानशिलात मारल्या.