मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बैठका आणि इतर हालचाली मनसेने सुरू केल्या आहेत. मनसे लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. मनसेची सोमवारी लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे मुंबईत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर काही जागांवरील संभाव्य उमेदवारांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, मनसे मुंबईतील सर्व सहा जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. तर ठाणे, कोकण येथे प्रत्येकी तीन जागांवर उमेदवार देऊ शकते. कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याच्या तयारीत मनसे आहे.
एकूण २२ जागांपैकी मुंबई- ६, ठाणे- ३, कोकण -३, पुणे- ४, नाशिक- २, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर या मतदारसंघावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय बैठकीत नेत्यांची कानउघाडणी करत जोमाने तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांचे नाव चर्चेत आहे. मुंबईच्या सर्व जागी मनसेकडून उमेदवार दिले जाऊ शकतात. कल्याणमधून विद्यमान आमदार राजू पाटील यांचे नाव चर्चेत आहे. बारामती किंवा पुण्यातून वसंत मोरे तर सोलापूरमधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे.