नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवार दि. ११ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी आधीची गॅरंटी पूर्ण केलेली नाही, पण आता ते दवंडी पिटत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत देशाने असे उत्तर दिले की, मोदी सरकारला दुस-यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन सत्ता सांभाळावी लागत आहे. १७ जुलै २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असेल, अशी गॅरंटी देशाला दिली होती.
ही गॅरंटी पोकळ ठरली. आता आधीची गॅरंटी पूर्ण झाल्यासारखी ३ कोटी घरे देण्याच्या बढाया मारत आहेत. पण देशाला खरी परिस्थिती माहिती आहे. या ३ कोटी घरांसाठी यावेळी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, कारण भाजपाने गेल्या दहा वर्षांत काँग्रेस-यूपीएपेक्षा १.२ कोटी कमी घरं बांधली. काँग्रेसने ४.५ कोटी घरं बांधली. त्याच वेळी भाजपाने (२०१४-२४) ३.३ कोटी घरे बांधली आहेत असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
खरगे यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींच्या आवास योजनेअंतर्गत, ४९ लाख शहरी घरांसाठी म्हणजे ६०% घरांसाठी बहुतेक पैसे जनतेने स्वत:च्या खिशातून भरले आहेत. तसेच सरकारी शहरी घराचीकिंमत सरासरी ६.५ लाख रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकार केवळ दीड लाख रुपये देते. यामध्ये राज्ये आणि नगरपालिकांचा वाटा ४०% आहे. उरलेला भार जनतेवर येतो असे संसदीय समितीने म्हटले आहे.
तीन कोटी घरांच्या बांधकामाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत तीन कोटी घरांच्या बांधकामासाठी सरकारी मदत मंजूर करण्यात आली आहे.