अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुष्ठानाचे कौतुक करताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. असे अनुष्ठान करणारा यापूर्वी असा एकच राजा झाला, केवळ छत्रपती शिवरायांनी यापूर्वी असे अनुष्ठान केले होते, असे गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपवास सोडला. त्यांनी ११ दिवस अन्यत्याग केला होता. पंतप्रधान मोदींनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व धार्मिक नियमांचे पालन केले. त्यांचे अनुष्ठान पाहता आपल्या परंपरेला साजेल असा एकच राजा झाला, तो म्हणजे राजा शिवछत्रपती.
तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा राहिली आहे. आज या क्षणी मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होत आहे. लोकांना कदाचित आठवत नसेल, ते स्वत: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैल्यम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही साक्षात भगवान शिवाचीच सेवा आहे, असे सांगितले, असे गोविंददेव गिरी म्हणाले. आज आपल्याला नरेंद्र मोदींच्या रूपाने तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत, ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा; भारत मातेची सेवा कर सांगून परत पाठवले. गोविंदगिरी महाराजांकडून भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होताच गर्दीतून छत्रपती शिवरायांचा जयजयकार झाला.