22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeराष्ट्रीयआणीबाणीशिवाय मोदींकडे बोलायला काहीच नाही

आणीबाणीशिवाय मोदींकडे बोलायला काहीच नाही

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर आणि यांच्यासह इतर केंद्रीय मंर्त्यांनी शपथ घेतली. सोमवारी एकूण २८० खासदारांनी शपथ घेतली. तर मंगळवारी २६४ खासदार शपथ घेणार आहेत. ही शपथ राज्यनिहाय खासदारांना दिली जात आहे.

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब हे खासदारांना शपथ देत आहेत. दरम्यान, विरोधकांकडून गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन निषेध केला. याचबरोबर, लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून इंडिया आघाडीचे खासदार नाराज आहेत. याबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, संसदेच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष हा मुद्दा कधीच नव्हता. आम्ही संविधान आणि नियमानुसार काम करतो. सर्व सदस्यांनी मिळून संसद चालवायची आहे.

२६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी सहकार्याचे आवाहन करताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोठे विधान केले आहे. संसदेबाहेर इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, पंतप्रधान किती दिवस हे बोलत राहतील, कुणास ठाऊक. त्यांच्याकडे आणीबाणीशिवाय बोलायला काहीच नाही. जे होते, ते घोषित केले होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ती अनसेड इमर्जन्सी (अघोषित आणीबाणी) आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात जनता आमच्यासोबत आहे, पण मोदीजींनी संविधान तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज येथे आंदोलन करत आहोत. प्रत्येक लोकशाही नियम मोडला जात आहे, म्हणूनच आज आम्ही मोदीजींना संविधानाचे पालन करण्यास सांगत आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR