23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीय‘सायलेंट व्होटर’च्या बळावर मोदींची हॅटट्रिक शक्य!

‘सायलेंट व्होटर’च्या बळावर मोदींची हॅटट्रिक शक्य!

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. आजवर निम्म्याहून अधिक जागांवर मतदान झाले. त्यात विरोधी पक्षाने प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर भाजपा सत्तेपासून दूर जातेय अशी विधाने करण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी आता पुन्हा देशाचे पंतप्रधान बनणार नाहीत असे राहुल गांधी म्हणाले. तर भाजपा सत्तेची हॅटट्रिक करण्याचा दावा करत आहे.

विरोधी पक्षाच्या दाव्यानुसार, सत्तेविरोधात नाराजीची लाट, युवक नाराज आहेत मग भाजपची अपेक्षा कुठल्या मतदारांवर आहे, ज्याच्या बळावर पुन्हा एकदा सत्तेत येण्याची अपेक्षा करत आह? एक महिन्यापूर्वी देशात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल अशी सर्वसामान्य धारणा होती. परंतु संविधान आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मोदी पुन्हा सत्तेत नको असे वातावरण तयार करण्यात विरोधकांना यश आले. देशातील काही भागात कमी मतदान, जनमानसात सत्ताविरोधी लाट, पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर विरोधकांनी भाजपा सत्तेपासून दुरावतेय असा अजेंडा सेट करणे सुरु केले. भाजपने गेल्या १० वर्षात सबका साथ, सबका विकास असा जो नारा दिला त्यात विरोधकांनी संविधान आणि लोकशाही धोक्यात असल्याचे सांगून खिंडार पाडले. २०२४ च्या निवडणुकीत मोदींचा सायलेंट वोटर किंगमेकरच्या भूमिकेत दृष्टिक्षेपात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘सायलेंट वोटर’ म्हणजे महिला, ज्या मोठ्या प्रमाणात मोदींमुळे भाजपसोबत उभ्या आहेत. भाजपच्या सत्तेच्या राजकारणात महिला मतदारांची मोठी भूमिका आहे. या महिला मतदारांमुळे पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९ या काळात पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता आणली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला देशातील ३६ टक्के महिलांनी मतदान केले होते. पंतप्रधान मोदीही स्वत: महिला मतदारांकडून मोठ्या आशा बाळगून आहेत.

२०१४ ला मोदी सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी सरकारच्या अनेक योजना महिला केंद्रीत करण्यास सुरुवात केली. गरिबांच्या घरी शौचालय बनवण्याचा निर्णय महिलांच्या मान सन्मानाशी जोडला जातो. उज्ज्वला योजनेतंर्गत १० कोटीहून अधिक महिलांना घरगुती गॅस सिलेंडर देणे, पाणीटंचाईचा सामना करणा-या महिलांना हर घर जल अभियानाशी जोडणे, इतकेच नाही तर पीएम आवास योजनेतून बनणा-या ६० टक्क्याहून अधिक घरांना महिलांच्या मालकीचा अधिकार देणे. गरोदर महिलांसाठी मातृ वंदन योजना, ज्यात महिलेला बाळाच्या जन्मानंतर ६ हजार रुपयांची मदत, पीएम स्वनिधी योजना, मुद्रा योजना, लखपती दिदीसारख्या योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. या योजनांचा लाभ झाल्याने महिला भाजपसोबत राहतील असे भाजपा नेत्यांना वाटते.

महिला मतदारांची ताकद

देशात ५ वर्षापूर्वी ४३.८ कोटी महिला मतदार होत्या. ज्या आता ४७.१ कोटीहून अधिक आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २०२४ च्या निवडणुकीत एकूण ९६.८ कोटी मतदार आहेत, ज्यात पुरुष ४९.७ कोटी तर ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. गेल्यावेळच्या तुलनेने महिला मतदारांची संख्या साडे चार कोटीने वाढली आहे. त्यामुळे महिला मतदारांची मोठी भूमिका आहे. काँग्रेसपासून सर्व विरोधी पक्ष महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला मतदारांवरील करिष्मा फारसा कमकुवत करू शकले नाहीत. त्यामुळेच या निवडणुकीत महिला मतदार भाजपसाठी मोलाची भूमिका बजावतील असे राजकीय तज्ञांना वाटते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR