नवी दिल्ली : टीएमसीच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांना इस्टेट संचालनालयाने तात्काळ सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या महिन्यात महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना तिसऱ्यांदा सरकारी घर सोडण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मोईत्रा यांना तात्काळ घर रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.
मोईत्रा यांना घर रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांचा सरकारी बंगला लवकरात लवकर रिकामा व्हावा याची खात्री करण्यासाठी इस्टेट संचालनालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवले जाणार आहे. महुआ मोइत्रा यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना ७ जानेवारीपर्यंत सरकारी घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. दुसऱ्यांदा १२ जानेवारी रोजी त्यांना घर रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आणि आता ही तिसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.